Ad will apear here
Next
राष्ट्रउभारणीसाठी वक्तृत्व आणि कर्तृत्वातून नेतृत्व घडवायला हवे
प्राध्यापकांनी पुढाकार घेण्याचे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांचे आवाहन


रत्नागिरी : ‘
समाजातील चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी आणि त्या बाजूने बोलण्यासाठी धाडस आणि चांगल्या वक्तृत्वाची आवश्यकता असते. त्यातून कर्तृत्व घडत जाते आणि त्यातूनच टप्प्याटप्प्याने नेतृत्व घडते, जे राष्ट्रउभारणीसाठी अत्यंत आवश्यक असते. या कार्यामध्ये सध्या प्राध्यापकांचा सहभाग फारसा दिसत नाही. प्राध्यापकांनी राष्ट्रउभारणीसाठी पुढाकार घेऊन चांगले नेतृत्व घडवण्याची आज नितांत गरज आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (नऊ जानेवारी २०२०) झालेल्या कीर्तनात ते बोलत होते. दुसऱ्या दिवशी आफळेबुवांनी निरूपणासाठी रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमधील ‘दीनानाथ हा राम कोदंडधारी’ हा श्लोक घेतला होता. पूर्वरंगात त्याचे निरूपण करताना बुवांनी रामायण काळात राक्षसांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषींनी राज्याच्या रक्षणासाठी राज्यकर्त्यांचे कसे प्रबोधन केले होते, याचा आढावा घेतला. 
ते म्हणाले, ‘त्या काळी गुरुस्थानी असलेल्या हट्टाग्रही ऋषी-मुनींनी कडक आणि कर्मठ निर्बंध सांभाळून उपासना करत असतानाच रामासारख्या त्या काळच्या नव्या नेतृत्वाला सबळ करणे, रणांगणावर उभे करणे यासारखे कार्य केले. त्यामुळे ऋषींची आध्यात्मिक सिद्धता कोठेही कमी झाली नाही किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यासारखे प्रकार झाले नाहीत. सध्या काही विद्यापीठांमध्ये देशद्रोहाची भावना शिकविण्याचे प्रयत्न दहा-दहा वर्षे सुरू आहेत. त्याचे समर्थन करण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याचे काम वक्ते करत आहेत; पण या विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी प्राध्यापकांकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांकडे वक्ते भरपूर आहेत; पण चांगला विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी तसे प्रवक्तेच नाहीत. याचे परिणाम देशाला भोगावे लागत आहेत.’

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या पुस्तिकेच्या विरोधात रत्नागिरीत नऊ जानेवारी रोजी सकाळी स्वातंत्र्यलक्ष्मी चौकात निदर्शने करण्यात आली. त्या वेळी कोणतीही भक्तमंडळे किंवा उपासना मंडळे सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात निषेध करण्यासाठी फलक घेऊन आली नाहीत. ‘अशाच भक्त मंडळांच्या सद्गुरूचा वाढदिवस असेल तर ८० हजार लोक जमतील; पण राष्ट्रीय अवमानाचा विरोध करण्यासाठी आठशेसुद्धा लोक जमत नाहीत. देशाबद्दल आस्था नसल्याचेच हे लक्षण आहे. त्यामुळेच भारताचा अवमान होत आहे,’ असेही आफळेबुवा म्हणाले.

दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनाच्या उत्तररंगात बुवांनी ‘योद्धा भारत’ या आख्यानविषयाच्या अनुषंगाने १९६२ साली झालेल्या चीनविरुद्धच्या लढाईत भारताला पत्कराव्या लागलेल्या नामुष्कीजनक पराभवाचे विश्लेषण केले. लेफ्टनंट जनरल कौल यांनी लिहिलेले ‘अनटोल्ड स्टोरी’, श्याम चव्हाण यांचे ‘वॉलोंग’ यांसह काही पुस्तकांतील दाखले देऊन आफळेबुवांनी १९६२ सालचे युद्ध श्रोत्यांसमोर उभे केले. 

‘भारतीय बुद्ध धर्माचा चीनमध्ये झालेला प्रसार हे कारण पुढे करून चीनने भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. ‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणून या संबंधांचा उल्लेख तेव्हा करण्यात आला. शांततेचा पुरस्कार करणारे चीन आणि जपानसारखे देश स्वतः मात्र नवनव्या शस्त्रास्त्रांनी सज्ज होत होते. भारत त्या बाबतीत मागे होता. अशा स्थितीत शांततेचा अग्रदूत होण्याच्या स्वप्नरंजनात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रमून गेले होते. त्यामुळे चीनकडून होणाऱ्या कारवायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. सेन, थापर इत्यादी तेव्हाचे लष्करप्रमुख नेहरूंना या कारवायांची माहिती देत; मात्र भारतीय सैन्याची धास्ती जगाला वाटू नये, याची काळजी घेण्याचा सल्ला नेहरूंकडून सैन्याला दिला जात होता. याच स्थितीचा गैरफायदा घेऊन चीनने भारताचा तिबेट हा प्रांत जिंकून घेतला; मात्र मैत्री आणि बंधुभावाच्या नात्याचा उल्लेख करत भारताने साधा निषेधही तेव्हा व्यक्त केला नाही,’ असे प्रतिपादन बुवांनी केले. 

‘तिबेटला जोडणारा रस्ता बांधायला चीनने १९५५ साली सुरुवात केली. १९५७ साली त्याचे उद्घाटन झाले. तोफा-दारूगोळा भारताच्या सीमेपर्यंत आणणे शक्य व्हावे, यासाठी हा रस्ता बांधला गेला होता, हे उघड होते. ‘ज्या भागात गवतही उगवत नाही त्याची भीती का बाळगावी,’ असे निवेदन तेव्हा नेहरूंनी संसदेत केले होते. ‘चीनने रस्ता बांधल्याने अतिक्रमण झाले; मात्र चीनकडून आक्रमण होईल असे मला वाटत नाही,’ असेही नेहरूंनी जाहीरपणे सांगितले होते. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पुढच्या पाच वर्षांनी, २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनच्या सैन्याने सर्व सामर्थ्यानिशी भारतावर जबरदस्त आक्रमण केले,’ असे बुवांनी सांगितले. 

‘भारताची १२ ठाणी चीनने अवघ्या चार दिवसांत जिंकून घेतली. नेफा प्रांत चीनने गिळंकृत केला. अपुरा आणि जुना शस्त्रसाठा, तसेच अपुऱ्या साधनसामग्रीमुळे भारतीय सैन्याला चीनच्या सैन्याशी लढता आले नाही. आंतरराष्ट्रीय दबाव लक्षात घेऊन चीनने ‌दोन महिन्यांच्या युद्धानंतर एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली; मात्र तरीही लडाखचा बारा हजार चौरस मैलांचा प्रदेश चीनला द्यावा लागला,’ असे प्रतिपादन आफळेबुवांनी केले.

‘तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांनी केलेल्या अनेक प्रयत्नांमुळे देशात सैन्याच्या सबलीकरणासाठी थोडाफार तरी हातभार लागला. त्यांनी जवानांचे पगार वाढविले. ‘एनडीए’ची स्थापना केली. मिलिट्री इंजिनीअरिंग, तसेच मिलिट्री नर्सिंग महाविद्यालये उभारण्यासाठी पुढाकार घेतला. तरीही त्यांचे प्रयत्न बलाढ्य चीनपुढे तुटपुंजेच ठरले. त्यांना हवी तशी साथ मिळाली नाही आणि शेवटी चीनच्या युद्धातील पराभवाचे खापर त्यांच्यावर फुटले आणि त्यांना पायउतार व्हावे लागले,’ असेही आफळेबुवांनी विशद केले.

चीनविरुद्ध १९६२ साली झालेल्या युद्धाच्या काळात सेनाधिकारी होशियार सिंग, सुभेदार जोगिंदर सिंग, शैतान सिंग, गुरखा पलटणीचे मेजर धनसिंग थापा, श्याम चव्हाण, विमान चालवत असताना शत्रुपक्षाची गोळी मांडीत लागल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतही चीनचा ६०० बॉम्बगोळ्यांचा साठा नष्ट करणारे वैमानिक टकले, मेल्यानंतरही आपल्या शरीराचा भार मशीनगनवर नेमका कसा राहील, याची काळजी घेऊन मरतानाही चीनचे एक हजार सैनिक मारणारे गोविंद कांबळे अशा सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाची कहाणी आफळेबुवांनी ओघवत्या शैलीत आणि वीररसप्रधान गीते, पोवाडे, अभंग आदींच्या साथीने श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभी केली. त्यामुळे वातावरण भारावून गेले होते. 

आफळेबुवांना हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), राजन किल्लेकर (सिंथेसायझर), उदय गोखले (व्हायोलिन), हरेश केळकर (तालवाद्य) आणि अभिजित भट (गायन) यांनी साथसंगत केली.

प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्याबद्दल आफळेबुवांच्या हस्ते पुस्तकभेट स्वीकारणारे विद्यार्थी.

प्रश्नमंजूषेतील विजेत्यांचा गौरव
कीर्तनाच्या पहिल्या दिवशीच्या निरूपणातील इतिहासावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या आदित्य महेश दामले, वेदांग महेंद्र पाटणकर आणि प्रथमेश उत्तम घाटे या विद्यार्थ्यांना आफळेबुवांच्या हस्ते पुस्तकभेट देऊन समारंभात गौरविण्यात आले. तसेच, ध्वनिव्यवस्था सांभाळणारे उदयराज सावंत यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे पुत्र ओमकार सावंत यांनाही गौरवण्यात आले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZSPCI
Similar Posts
इंदिराजींच्या कणखर भूमिकेमुळे १९७१च्या युद्धात भारताचा विजय रत्नागिरी : ‘अमेरिका, इंग्लंड अशा बलाढ्य देशांचा दबाव असूनही, कणखर राहून त्याकडे साफ दुर्लक्ष करून १९७१ साली झालेल्या युद्धात इंदिरा गांधी यांनी अभूतपूर्व मुत्सद्देगिरी केली. त्यांच्या कणखरतेमुळेच पाकिस्तानचे विभाजन करण्यात यश मिळाले. त्याआधीच्या सरकारांनी केलेल्या चुका त्यांनी केल्या नाहीत,’ असे प्रतिपादन
‘कीर्तनसंध्या’मधून उलगडणार स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय योद्ध्यांची कहाणी रत्नागिरी : स्वातंत्र्ययुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आणि प्रसंगी बलिदान करणाऱ्या योद्ध्यांची कहाणी या वर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवात उलगडणार आहे. ‘योद्धा भारत’ हा या वेळच्या कीर्तनांचा आख्यानविषय आहे. प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांच्या
रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सव यंदा ‘योद्धा भारत’ या विषयावर रत्नागिरी : ‘योद्धा भारत’ म्हणजेच स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा आढावा हा या वर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवाचा विषय आहे. नवव्या वर्षात पदार्पण करतानाच दशकपूर्तीकडे वाटचाल करणारा कीर्तनसंध्या महोत्सव नव्या वर्षाच्या प्रारंभी, आठ ते १२ जानेवारी २०२० या काळात रंगणार आहे
देशाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शास्त्रीजींनी केला रत्नागिरी : ‘स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक दुसरे पंतप्रधान लालबहादूरशास्त्री यांनी केला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानची लष्करी ठाणी ताब्यात घेण्याचे कार्य त्यांच्या आदेशामुळे १९६५ साली साध्य झाले,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी रत्नागिरीत केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language